दर तीन - चार वर्षांनी पॅसिफिक महासागराच्या बहुतांश पृष्ठभागाचे सुमारे पाच ते सहा अंश सेंटीमीटर नी तापमान वाढते. युरोपच्या भौगोलिक क्षेत्रफळाएवढे याचे आकारमान असते. उष्ण पाण्याची घनता थंड पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ही आश्चर्यकारक घटना घडत असते. महासागराच्या ज्या क्षेत्राचे उष्णतामान वाढलेले असते, त्या क्षेत्राची पातळी इतर भागापेक्षा सुमारे पाच ते सहा इंच वाढते. जणू काही पाच ते सहा इंच जाडीचा एक थर समुद्रावर जमा होतो. हवेचा दाब व पाण्याचे तापमान यांचा सहसंबंध असल्याने तापमान वाढलेल्या या क्षेत्रावरून वाहणारे वारे आपली दिशा बदल वितात आणि तापमान वाढलेला हा हवेचा पट्टा 100 किमीच्या वेगाने पुढे सरकतो. यालाच एल निनो म्हणतात.
October 20, 2022
October 17, 2022
तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक का ठेवत नाहीत ?
जिज्ञासा -
तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक का ठेवत नाहीत ?
तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक ठेवल्यास ताकातील लॅक्टिक आम्लाची तांबे व पितळ या धातूंवर अभिक्रिया होते आणि त्यापासून विषारी क्षार बनतात.हे विषारी क्षार ताकात मिसळतात व ताक कळकते म्हणून तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक ठेवत नाहीत .तांबे -पितळ धातूंवर आम्लाची क्रिया होऊ नये म्हणून अशा भांड्यांवर कथलाचा थर देतात.म्हणजेच कल्हही करतात.कथलावर जरी आम्लाची अभिक्रिया झाली तरी त्यापासून बनलेले क्षार विषारी नसतात.
मोती,शंख,शिंपले कसे बनतात ?
ऑईस्टर प्राण्याचे शरीर व भोवतीचा शिंपला यांच्यामध्ये कधी कधी रेतीचा एखादा बारीक कण घुसतो.हा कण त्या त्या प्राण्याच्या मऊ शरीराला टोचू लागतो.या त्रासापासून सुटण्यासाठी त्या कणाभोवती तो कॅल्शियमच्या क्षाराचे थर चढवतो.
सर्व बाजूंनी अनेक थर दिल्यामुळे कणाचा खडबडीतपणा त्याला जाणवत नाही.हा कण जर शिंपल्यातील जागेत फिरू शकत असेल तर क्षाराचे एकावर एक थर बसून त्याचा सुंदर गोल तयार होतो.हा गोल चमकदार खडा म्हणजेच मोती.
शंख किंवा शिंपला तयार करणारा प्राणी आपल्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट नावाच्या एका क्षाराचे चिकट लुकण बाहेर टाकून त्याचे एकावर एक अनेक थर चढवतो.हे लुकण सुकले की चांगले टणक बनते.प्राणी जसा मोठा बनतो तसा तो आणखी थर चढवतो व शिंपला चांगला मोठा होतो.यातील जुने थर बाहेरच्या भागात तर नवे थर आतील भागात असतात.
गोगलगाई विविध प्रकारचे शंख असेच तयार करतात.
October 16, 2022
फ्रिज वारंवार बंद का करू नये ?
जिज्ञासा
फ्रिज वारंवार बंद का करू नये ?
फ्रिज वारंवार बंद केल्याने जेवढी विद्युतउर्जा वापरली जाते त्याच्याहून कितीतरी जास्त उर्जा पुन्हा तो चालू करताना खर्च होते.फ्रिज बंद केल्यानंतर फ्रिजच्या आतील तापमान वाढते व फ्रिजमधील बर्फाचे पाण्यात रुपांतर होते.फ्रिज पुन्हा चालू केल्यानंतर त्याच्या आतील तापमान कमी होण्यास म्हणजे ० अंश से.पर्यंत येण्यास कालावधीही लागतो व पाण्याचे रुपांतर बर्फात होण्यास बरीच उर्जा लागते. ती वाचवलेल्या उर्जेच्या जवळजवळ दुप्पट असते.
October 15, 2022
शिंक का येते?
जिज्ञासा
शिंक का येते ?
शिंक येणे ही प्रतिक्षिप्त शारीरिक क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे मेंदूच्या नकळत मज्जारज्जू मार्फत आपल्या संरक्षणाकरिता किंवा अन्य काही कारणास्तव अवयवांच्या ज्या क्रिया घडवून आणल्या जातात त्यांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. अशा क्रियांवर आपला ताबा नसतो. नाकाच्या आत पातळ त्वचा असते. ती काही कारणाने हुळहुळली किंवा चुरचुरली तर शिंक येते. सर्दी झाल्यानंतर आतील त्वचा थोडी सुजते किंवा बाहेरील एखादा कण गेल्याने किंवा स्पर्शामुळे शंका येते. अशावेळी आतील हवा जोराने बाहेर फेकली जाऊन त्या योगे आतील कण, बाष्प हवेच्या झोताबरोबर बाहेर फेकले जाते. शिंक आणण्यासाठी काहीजण तपकीर ओढतात किंवा दोऱ्याचे टोक नाकात घालतात.
October 11, 2022
पावसाचे पाणी बेचव का लागते ?
जिज्ञासा
पावसाचे पाणी बेचव का लागते ?
पावसाचे पाणी हे उर्ध्वपातीत पाणी असते .म्हणजेच ते ढगातून खाली येते.सूर्याच्या प्रखर उष्णतेने भूजलाचे बाष्पीभवन होते.बाष्पीभवन होताच पाण्यातील क्षार हे जमिनीवरच राहतात व फक्त शुद्ध पाणी बाष्परुपात हवेत जाते.हवेतील या बाष्पाचेच संद्रीभावन होऊन मगच पाऊस पडतो.हवेतून जेव्हा या पाण्याचे थेंब खाली येतात ,तेव्हा खाली येताना त्यात कार्बन डायऑक्साईड विरघळतो परंतु त्याचे प्रमाण अगदीच अल्प असते.त्यामुळे पावसाचे पाणी हे जवळपास क्षारविरहित शुद्ध पाणी असते व त्याला चव नसते.