Showing posts with label मराठी निबंध. Show all posts
Showing posts with label मराठी निबंध. Show all posts

August 17, 2024

रक्षाबंधन मराठी निबंध



रक्षाबंधन 

नारळी पौर्णिमा या सणांची माहिती


सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,

ओवाळिते भाऊराया,

वेड्या बहिणीची वेडी रे माया।

       या गाण्याच्या ओळी आठवण करून देतात भाऊबीजेची. मला या सणासारखाच वाटणारा, आवडणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. भावा- बहिणीचे नाते दृढ करणारा हा सण. राखी पौर्णिमेला मला आठवते, ती राणी कर्मावतीची गोष्ट. राणी कर्मावती ही एक रजपूत स्त्री. पण तिने मुघल सम्राट हुमायूनला राखी पाठवली. या एका धाग्याने सारा इतिहासच बदलला. मुघल सम्राटाने राणी कर्मावतीची राखी स्वीकारली; आणि तिने जोडलेले भावाचे नातेदेखील निभावले. आपापसातील वैर, भांडण मिटवून प्रेमाचे, आपुलकीचे नाते जोडले. या गोष्टीवरून राखीचे महत्त्व लक्षात येते की नाही ? या सणाच्या निमित्ताने बंधुभाव निर्माण करता येतो. भावाने बहिणीचे रक्षण करणे, हे त्याचे कर्तव्य असते नि त्या कर्तव्याची भावना राखीच्या धाग्याने दृढ होते.

पूर्वी हळदीमध्ये भिजवलेल्या सुती दोऱ्यात मोहरी व सोने बांधून राखी तयार केली जात असे. या राखी बांधण्यामागे हेतू होता, भावाचे अशुभापासून रक्षण व्हावे व भावाने बहिणीचे तिच्या संकटकाळी रक्षण करावे. असा दुहेरी बंधन असलेला हा सण पूर्वापार साजरा होत आहे.

आज बाजारात विविध कलाकुसरीच्या राख्या पाहायला मिळतात. राख्यांचे स्वरूप अधिकाधिक कलात्मक होत असले, तरी त्यामागील हेतू, भावना मात्र तीच आहे. भावा-बहिणीच्या निःस्वार्थ प्रेमाचे नाते सांगणारा हा सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो.


 नारळी पौर्णिमा


          याच दिवशी येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण म्हणजे खास कोळी लोकांचा, खलाशांचा. यांचे जीवन समुद्राशी निगडित असते. आषाढात समुद्र खवळतो, वादळ होण्याची शक्यता असते; त्यामुळे समुद्रातून होणारा व्यापार, होणारा प्रवास मंदावतो. पुन्हा श्रावणापासून हे व्यवहार सुरू होतात. पण त्यापूर्वी खवळलेल्या समुद्राला शांत करून त्याची पूजा करतात. त्या समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो.

          समुद्रकिनारी वाढणारी झाडे म्हणजे नारळाची झाडे. ह्या नारळाचे फळ म्हणजे श्रीफळ. ह्यांला हिंदूंनी पवित्र मानले आहे. म्हणून कोणत्याही शुभ कार्यात श्रीफळाला मानाचे स्थान दिले जाते. कोणाचाही आदर- सत्कार करताना आपण त्याला श्रीफल देतो ना, तसेच हे कोळी लोक समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याचा आदर-सत्कार करतात.

           या सणाचे पक्वान्न म्हणजे नारळी भात. अशा त-हेने हे दोन्ही सण आपल्याला बरेच काही शिकवतात.







May 4, 2023

माझा आवडता ऋतू मराठी निबंध

 माझा आवडता ऋतू मराठी निबंध

       आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद,हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. सर्व ऋतूंमध्ये वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो.

    पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो. डोक्यावर रणरणणारे ऊन,पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मानेवर अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव नकोसा झालेला असतो, उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात, सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसाचे टाकत असते,सर्व पशुपक्षीदेखील थंडगार सावलीचा निवारा शोधत असतात आणि त्याचवेळी पाऊस येतो धो- धो कोसळत. वातावरणातील उकाड्याचा सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमांत गारवा शिरतो, चराचर सृष्टी तृप्त होते.असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही?

     जून मध्ये शाळा सुरू होते.त्याच्या आसपास पावसाळा सुरू होतो. नवे वर्ष, नवा वर्ग, नवा गणवेश,नवी पुस्तके आणि नवी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. त्याचवेळी हा चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या तऱ्हेतऱ्हेचे रेनकोट यांमुळे शाळेकडे जाणारी वाट रंगानी फुलून जाते.वाटते की जणू ती वाटच आपल्या सोबत उत्साहाने शाळेत येत आहे!

     हा पाऊस मोठा जादूगार आहे. तो रुक्ष रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमली सारखी हिरवळ पसरते. वृक्षवेली हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटतात. शेते हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात. खळाळणारे ओढे नाले सगळीकडून धावत असतात. सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते.

     या पावसाची रूपे तरी किती? कधी तो थुई थुई नाचत येतो.कधी रिमझिमत येतो; कधी तो धो धो कोसळतो; तर कधी प्रचंड गडगडाट करत, विजांचा चकचकाट करत धुवाधार बरसतो.

           एखाद्या दिवशी प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात. भर दिवसा जणू रात्र सुरू होते.पाऊस पडून गेला की धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. अचानक उघडीप येते, तेव्हा सर्वत्र हिरवागार गालीचा पसरल्यासारखे वाटते. पहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते. क्वचित सूर्याला पावसाची मजा लुटायची लहर येते. मग ढगांना बाजूला सारून तो नभांगणात उतरतो. त्याची सोनेरी किरणे पावसात चमचमू लागतात आणि काय आश्चर्य! आकाशात ते मनोहरी इंद्रधनुष्य तरळू लागते आणि बालकवींच्या ओळी मनात अलगद उतरतात -

 वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;

मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे!

 असा हा सुखदाता पावसाळा सर्वसृष्टीचा पोशिंदाही आहे.तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरणी मातेला सुजलाम सुफलाम बनवतो. चार महिन्यात हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची, धान्याची बेगमी करतो. म्हणूनच मी म्हणतो की,वर्षाऋतू म्हणजे पावसाळा हाच सर्व ऋतूंचा राजा आहे!




November 24, 2022

महात्मा ज्योतीराव फुले यांचे कार्य Mahatma Jyotirav Fule





 महात्मा जोतिबा फुले


मित्रांनो, आज आपली आई सुशिक्षित आहे, आपली बहीण शाळेत -जाते नि आपल्याला शिकवणाऱ्या बाईच आहेत, याचे सारे श्रेय आहे महात्मा जोतिबा फुले यांना. स्त्रिया आणि दलित बांधव यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत सर्वप्रथम प्रज्वलित करणाऱ्या ह्या महापुरुषाचा जन्म १८२७ मध्ये झाला.


जोतिबांचे शिक्षण मिशन स्कूलमध्ये झाले, त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र वाचले, जॉर्ज वॉशिंग्टनचे चरित्र वाचले. पुढे इंग्रजी चांगले वाचायला यायला लागल्यावर थॉमस पेनच्या 'राईट्स् ऑफ मॅन' या पुस्तकाचा त्यांनी अभ्यास केला. त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यातूनच लोकजागृती व लोकशिक्षणाचे काम त्यांनी हाती घेतले.


त्या काळातील परिस्थिती समजून घेऊन त्यांनी स्त्री- उद्धाराचा ध्यास घेतला. एक स्त्री शिकली, तर घर सुधारते; घर सुधारले, की समाज सुधारतो; समाज सुधारला, की देश सुधारतो; म्हणून प्रथम त्यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यांनी स्त्री-उद्धाराचा ध्यास घेतला. मुलींना शिकवण्यासाठी प्रथम त्यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाईंना साक्षर केले. लोकांचा विरोध आणि छळ सोसून सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात साथ दिली. स्त्रीला या ज्ञानप्रकाशात आणणारे जोतिबा म्हणजे शैक्षणिक क्रांतीचे आद्यजनक होत. जोतिबांचे कार्य, वाढती लोकप्रियता समाजातील काही लोकांना


खटकू लागली. एकदा तर लोकांनी त्यांच्यावर मारेकरी घातले. मध्यरात्रीच्या शांत वेळी जोतिबा झोपले असताना दोन आकृती त्यांना दिसल्या. त्यांनी विचारले, “कोण आहे ? कशासाठी आलात ?" या प्रश्नांची उत्तरे मिळाली. जोतिबांना आश्चर्यच वाटले. त्यांनी त्या मारेकऱ्यांना विचारले, “मला मारून तुमचा काय फायदा ?" त्यावर ते मारेकरी उत्तरले, "आम्हाला या कामासाठी प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत.” त्यावर जोतिबा म्हणाले, “ठीक आहे. माझ्या मृत्यूमुळे तुमचा फायदा होणार असेल, तर मला खुशाल मारा. माझे आयुष्य दीन- दलितांसाठीच आहे. तेव्हा माझ्या मृत्युमुळे तुमचे हितच होणार आहे.' जनतेच्या उद्धारकर्त्याचे शब्द ऐकताच मारेकरी खजील झाले. दोघेही त्यांच्या पाया पडले नि पुढे त्यांचे ते निष्ठावंत भक्त बनले..


जोतिबांनी 'सत्यशोधक समाज' नावाची संस्था स्थापन केली. त्यातून त्यांनी विवाहाच्या पद्धतीत बदल सुचवला. स्त्री-जीवनाची कथा व व्यथा जाणून त्यांच्या उद्धारासाठी अविश्रांत धडपड करून नवा समाज घडविणाऱ्या या लोकनायकाला लोकांनी 'महात्मा' ही पदवी अर्पण केली.


असे हे थोर पुरुष २८ नोव्हेंबर १८९० रोजी काळाच्या पडद्याआड गेले. प्रत्येक स्त्रीला सुशिक्षित करणाऱ्या या पित्याला समाज कधीच विसरणार नाही.

November 14, 2022

जननायक बिरसा मुंडा






 नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, आज आपण जननायक बिरसा मुंडा यांची माहिती पाहणार आहोत.

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी सुगाना व करमी या आदिवासी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलिहातू हे रांचीजवळ आहे.


बिरसाचे आई-वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता.


तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन-कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या


विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. १८९४ साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले.


तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. 'उलगुलान' म्हणजे एकाचवेळी सर्वांगीण उठाव.


१८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणले; परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही.


१८९८ मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे ४०० आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

सन १९०० मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे ९ जून १९०० रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले.


या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना 'जननायक' हा किताब बहाल केला.

October 24, 2022

माझा आवडता संत - संत ज्ञानेश्वर MAJHA AAVDTA SANT SANT DNYANESHWAR






 माझा आवडता संत 

  संत ज्ञानेश्वर 

शक्तीच्या ऐलतीरावर भक्तीच्या पैलतीरावर पहुडलेल्या महाराष्ट्राला मानवतेच्या दिव्य प्रकाशाने तेजोमय करण्याचं काम एका तेजस्वी ज्ञानसूर्यानं केलं,हा ज्ञानसूर्य म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर होय.ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वी इथला भक्तीचा मार्ग फक्त उच्चवर्णीयांच्याच दरावरून जाट होता.तोच भक्तीचा मार्ग अधिक सोपा करून बहुजनांच्या घरापर्यंत नेण्याचे काम ज्ञानदेवांनी केले.वडील विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांनी प्रायश्चित म्हणून स्वतःचं आयुष्य संपवल्यावरही ,आळंदीकरांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा छळ थांबवला नाही.ज्या माणसांनी अनाथ ज्ञानदेवांच्या झोळीत 'भिक्षा'ही घातली नाही त्या माणसांच्या अज्ञानी झोळीत ज्ञानाचं भांडार ओतण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं.

 वर्णभेदाच्या आणि जातिभेदाच्या सीमारेषांमध्ये बंदिस्त असलेला तत्कालीन समाज मानवता विसरून गेला होता. अत्मोद्धाराचे सामर्थ्य असलेली ईश्वरभक्ती कर्मकांडाच्या चौकटीत बंदिस्त होती.अशा वेळी ज्ञानेश्वरांनी प्रवाहविरोधी भूमिका स्वीकारून महाराष्ट्राच्या मातीवर परिवर्तनाची पताका उभी केली.योग,कर्मकांड,दांभिकता यांसारख्या सामान्य माणसांना अशक्य असणाऱ्या गोष्टी नाकारून सर्वसामान्य माणसांसाठी 'हरिपाठाच्या'माध्यमातून नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग सांगितला.

बरे केले ज्ञानदेवा,सांगितला हरिपाठ ।

आम्हा साध्या माणसांना ,सोपा केला परिपाठ ।।

उच्चवर्णियांच्या गुलाबी ओठांवर खेळणाऱ्या 'संस्कृत' भाषेत ज्ञानाचे भंडार बंदिस्त होते.हे ज्ञान सर्वसामान्य  माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ,सर्व सामन्यांच्या गळी उतरवण्यासाठी ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी' लिहिली.

" माझ्या आईच्या भाषेत,आहे ग्रंथ 'ज्ञानदेवी'

सांगे जीवनाचे सार ,तिची एक-एक ओवी."

सोपी भाषा,साधी उदाहरणे आणि दैनंदिन जीवनातील दाखले या साहित्य वैशिष्ट्यांचा विचार केला तर संत ज्ञानदेव फक्त 'संत'च नाही तर महान प्रतिभावंत वाटतात.

आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची बीजे सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानदेवांच्या विचारात आढळतात."

पेरुनी नुसतीच हिंसा,उगवेल कशी अहिंसा.'

या भाषेत ज्ञानदेवांनी यज्ञात बळी देण्याच्या प्रथेला ,हिंसेला विरोध केला.

" योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी l वायाचि उपाधी दंभ धर्म अशा कर्मकांडाला ज्ञानदेवांनी विरोध केला.

सातशे वर्षांपूर्वी सर्व जातीधर्मातील संतांना एकत्र करून 'वारकरी संप्रदायाच्या' रूपाने त्यांच्या हातामध्ये ज्ञानदेवांनी समतेची पताका दिली.आजही ती पताका खांद्यावर घेऊन वारकरी सांप्रदाय साऱ्या देशाला शांतीचा व समतेचा संदेश देत पंढरीची वाट चालतो आहे. 

आजच्या भंगलेल्या समाजव्यवस्थेमध्ये ,दुभंगलेल्या मनांना जोडण्याचे सामर्थ्य ज्ञानोबांच्या अभंगांमध्ये आहे.आजही सारा महाराष्ट्र ज्ञानोबांना डोक्यावर घेऊन नाचतो आहे.खरं तर ; ज्ञानोबांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे गरजेचे आहे.त्यांच्या नावाचा नुसता गजर करण्याऐवजी त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलाविले की नाही याला पुरावा नाही पण रेड्याप्रमाणे स्थूल झालेल्या सामान्य माणसांना बोलते करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.ज्ञानदेवांनी दगडी भिंत चालवली की नाही ,हे निश्चित माहित नाही ,परंतु वर्णभेदाच्या चौकटीत भिताड झालेल्या माणसांना चालतं-बोलतं करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं हे नाकारता येणार नाही अशा या ज्ञानाच्या महासागराबद्दल बोलताना आपोआपच आपल्यासारख्यांना मर्यादा येतात आणि शब्द तुकोबांच्या शब्दांचा आधार घेतात.....

" ज्ञानियांचा राजा गृरू महाराव ,

म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे,

मज पामरा हे काय थोरपण ,

पायाची वहान पाया बरी ।।