June 26, 2023

हिरवे मित्र - वरूण वृक्षाची ओळख





 नमस्कार मित्रांनो,

 आज आपण 'हिरवे मित्र'  या ज्ञान मालिकेमध्ये वरुण वृक्षाची ओळख करून घेणार आहोत.

 वरूण हा मध्यम आकाराचा वृक्ष निम सदाहरित वनांमध्ये नदीकाठी वाढतो. तो शहरातही अनेक ठिकाणी लावलेला दिसतो. वरुणाची पाने बेलासारखी तीन पर्णिकांनी बनलेली असतात. हिवाळ्यात ही सारी पाने गळतात.हिवाळा संपता संपता वरुणाला शुभ्र पांढरी, सुवासिक, अत्यंत सुंदर फुले येतात. या फुलांमध्ये गुलाबी रंगाचे फुलांच्या बाहेर डोकावणारे पुंकेसर असतात.ही फुले जेव्हा फुलतात तेव्हा झाडावर पाने नसतात. त्यामुळे गच्च फुलांनी बहरलेले वरुणाचे झाड खूप आकर्षक भासते. फुलांच्या तळाशी मधुरस असतो. एकदा फुलांचे परागीभवन झाले की ती पिवळी पडतात. कधी कधी या फुलांसोबतच झाडावर नवी कोवळी पालवी अवतरते. वरुणाच्या सालीपासून 'वरूणादी क्वाथ ' नावाचे औषध मिळते.वरुणाला ' वायवर्ण 'असेही एक नाव आहे.वरूण हा अनेक ठिकाणी मंदिरांजवळ, बौद्ध धर्मीयांच्या मठाजवळ लावलेला असतो. त्यामुळे तो भारतातल्या धार्मिक महत्वाच्या वृक्षांपैकी एक आहे.त्याचे पुंकेसर कोळ्यांच्या लांबसडक पायांसारखे दिसतात. म्हणून वरुणाला इंग्लिश मध्ये 'स्पायडर ट्री 'असे नाव आहे.




June 23, 2023

विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीबाबत महत्वाचा शासन निर्णय




विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती बाबत महत्त्वाचा शासन निर्णय 





विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकांची कमतरता विचारात घेऊन, विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्यास प्रवृत्त करावे. अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकाच्या जागेवर करण्यात यावी आणि प्रत्यक्ष पदवी प्राप्त करेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येऊ नये, अशी तरतूद उक्त संदर्भ क्रमांक २ येथील शासन परिपत्रकान्वये करण्यात आली आहे. परंतु उक्त संदर्भ क्र.१ येथील अधिसूचनेमधील तरतूद क्र. (४) ख अनुसार शिक्षकाची एका स्तरामधून दूसऱ्या स्तरामध्ये पदोन्नती करताना एनसीटीई ने निश्चित केलेली किमान अर्हता धारण करणे आवश्यक आहे. यामधील तरतुदीनुसार इ. ६ वी ते ८ वी वर्गाकरीता असलेली प्रशिक्षीत पदवीधर अर्हता, तसेच सद्यस्थितीत विज्ञान शाखेतील पदवीधर उमेदवारांची उपलब्धता विचारात घेता, शासन परिपत्रक दि. १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६ येथील तरतुद कालबाह्य ठरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे:-


शासन परिपत्रक-


शासन परिपत्रक दिनांक १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६ येथील तरतूद वगळण्यात येत असुन, सदर तरतुदीनुसार विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत या शिक्षकांनी पदवी अर्हता धारण केली नसल्यास, अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदांवर करण्यात यावी. ०२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध


करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०६२३१३२२१६६०२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

June 20, 2023

मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन

 मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन 

 

*जुन महिना*----------------

1) SMC मिटिंग आयोजन 14/6

2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.

3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन

4) Student pramotion करणे.

5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.

6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.

7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.

8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.

9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 

10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड

11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.

12) Staff Attach-deteach करणे.

13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6

14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ

15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.

16)शा.पो.आ. करारनामा करणे.

17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.

18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.


*जुलै महिना*----------------

1) माता-पालक संघ सभा

2) सरल st. request-coinfirm पाठविणे.

3) मीना राजु मंच सभा

4) SMC मिटिंग

5) कथाकथन स्पर्धा आयोजन

6) शा.पो.आ.सभा

7) दिंडी उपक्रम आयोजन

8) पालक सभा आयोजन

9) आदर्श परिपाठ तयारी

10) गुरुपोर्णिमा उपक्रम

11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी

12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी

13)पायाभुत चाचणी 1 आयोजन 


*आँगस्ट महिना*------------------

1) Student माहिती online भरणे.

2) शिक्षक -पालक संघ सभा

3) SMC मिटिंग आयोजन

4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी

5) सरल school portal भरणे.

6) सरल Staff portal भरणे.

7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम 

8) अकारिक चाचणी १ आयोजन

9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन

10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8

11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन

12) परिसर सहल आयोजन


*सप्टेंबर महिना*-----------------

1) माता-पालक संघ सभा

2) संच मान्यता portal भरणे.

3) गणपती उपक्रम 

4) SMC मिटिंग

5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.

6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.

7) शा.पो.आ.सभा

8) मीना राजु मंच सभा

9) पालक सभा आयोजन

10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.

11) पायाभुत online marks भरणे.

12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.

13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.

14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम 

15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9


*आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना*--------------------

1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.

2) सत्र 1 परीक्षा घेणे.

3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन

4) स्वच्छता अभियान राबविणे.

5) SMC मिटिंग

6) दिवाळी अभ्यास नियोजन

7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10

8) नवरात्र भोंडला आयोजन.

9) चित्रकला उपक्रम आयोजन.

10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.

11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी

12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.

13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन

14) शिक्षक -पालक संघ सभा

15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन

16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10


*डिसेंबर  महिना* --------------------

1) माता पालक संघ सभा

2) SMC मिटिंग

3) शा.पो.आ.सभा

4) पालक सभा आयोजन

5) कला व क्रिडा स्पर्धा 

6) शैक्षणिक सहल आयोजन

7) Udise+ Online भरणे

8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.

9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम


*जानेवारी महिना*------------------

1) शिक्षक -पालक संघ सभा

2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 

3) सा.फुले जयंती उपक्रम 

4) सांस्कृतिक कार्यक्रम 

5) बाल आनंद मेळावा

6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1

7)नेताजी जयंती 23/1

8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन


*फेब्रुवारी महिना* --------------------------

1) माता पालक संघ सभा

2) शा.पो.आ.सभा

3) पालक सभा आयोजन

4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा 

5) आकारिक चाचणी 2 आयोजन

6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी

7) शिवजयंती कार्यक्रम 19/2

8) Udise + online भरणे.


*मार्च महिना* -------------------------

1) शिक्षक -पालक संघ सभा

2)SMC मिटिंग

3) वार्षिक तपासणी

4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ 

5) शाळेची वार्षिक तपासणी

6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग 

7) SSA online link भरणे.

8) जागतिक महिला दिन 8/3

9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3

10) जागतिक अपंग दिन 17/3

11) संत गाडगेबाबा जयंती 4/3

12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.


*एप्रिल महिना* -----------------

1) माता-पालक संघ सभा

2)शा.पो.आ. सभा

3) द्वितीय सत्र परीक्षा 

4) पायाभुत चाचणी 3

5) माँडरेशन तयारी

6) महात्मा फुले जयंती 11/4

7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.

8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.

9) आंबेडकर जयंती 14/4

10) नवोद्य परीक्षा 5 वी

11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी


*मे महिना* ----------------------

1)निकाल जाहीर करणे 

2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.

3) पुढील वर्ष वर्गवाटप,

4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.

5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.

6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल

7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.

 --------------------------------------------

May 4, 2023

माझा आवडता ऋतू मराठी निबंध

 माझा आवडता ऋतू मराठी निबंध

       आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद,हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. सर्व ऋतूंमध्ये वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो.

    पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो. डोक्यावर रणरणणारे ऊन,पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मानेवर अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव नकोसा झालेला असतो, उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात, सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसाचे टाकत असते,सर्व पशुपक्षीदेखील थंडगार सावलीचा निवारा शोधत असतात आणि त्याचवेळी पाऊस येतो धो- धो कोसळत. वातावरणातील उकाड्याचा सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमांत गारवा शिरतो, चराचर सृष्टी तृप्त होते.असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही?

     जून मध्ये शाळा सुरू होते.त्याच्या आसपास पावसाळा सुरू होतो. नवे वर्ष, नवा वर्ग, नवा गणवेश,नवी पुस्तके आणि नवी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. त्याचवेळी हा चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. त्याच्यासोबत नाचत बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या तऱ्हेतऱ्हेचे रेनकोट यांमुळे शाळेकडे जाणारी वाट रंगानी फुलून जाते.वाटते की जणू ती वाटच आपल्या सोबत उत्साहाने शाळेत येत आहे!

     हा पाऊस मोठा जादूगार आहे. तो रुक्ष रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमली सारखी हिरवळ पसरते. वृक्षवेली हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटतात. शेते हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात. खळाळणारे ओढे नाले सगळीकडून धावत असतात. सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते.

     या पावसाची रूपे तरी किती? कधी तो थुई थुई नाचत येतो.कधी रिमझिमत येतो; कधी तो धो धो कोसळतो; तर कधी प्रचंड गडगडाट करत, विजांचा चकचकाट करत धुवाधार बरसतो.

           एखाद्या दिवशी प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात. भर दिवसा जणू रात्र सुरू होते.पाऊस पडून गेला की धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. अचानक उघडीप येते, तेव्हा सर्वत्र हिरवागार गालीचा पसरल्यासारखे वाटते. पहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते. क्वचित सूर्याला पावसाची मजा लुटायची लहर येते. मग ढगांना बाजूला सारून तो नभांगणात उतरतो. त्याची सोनेरी किरणे पावसात चमचमू लागतात आणि काय आश्चर्य! आकाशात ते मनोहरी इंद्रधनुष्य तरळू लागते आणि बालकवींच्या ओळी मनात अलगद उतरतात -

 वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;

मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे!

 असा हा सुखदाता पावसाळा सर्वसृष्टीचा पोशिंदाही आहे.तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरणी मातेला सुजलाम सुफलाम बनवतो. चार महिन्यात हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची, धान्याची बेगमी करतो. म्हणूनच मी म्हणतो की,वर्षाऋतू म्हणजे पावसाळा हाच सर्व ऋतूंचा राजा आहे!




January 15, 2023

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण माझा भारत महान






प्रजासत्ताक दिनानिमित्त

मराठी भाषण

     माझा भारत महान

 आम्ही सारे भारतीय आहोत.

 भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.

 प्रार्थनेच्या वेळी प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याकडून ही प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते या प्रतिज्ञातून व्यक्त होणाऱ्या भावना लहानपणापासूनच मुलांच्या मनात दृढ होत जातात.

   आपल्या भारत मातेच्या अफाट पसरलेल्या भूमीवर विविध भाषा, विविध संस्कृती,अनेक जाती अनेक धर्मांची लोक आहेत. या देशात उत्तरेला जम्मू काश्मीर पासून दक्षिणेला तामिळनाडू केरळ पर्यंत, पश्चिमेला असलेल्या गुजरात महाराष्ट्रापासून ते पूर्वेच्या आसाम नागालँड पर्यंत 29 राज्य आहेत प्रत्येक राज्याची स्वतःची अशी मातृभाषा,  बोलीभाषा यामध्येही विविधता आहे.

 हिंद देश के निवासी,

 सभी जन एक है 

 रंग रूप वेश भाषा

 चाहे अनेक है ।'

 या भारत देशामध्ये हिंदू हा प्रमुख धर्म मानला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदू संस्कृती प्रत्येक भारतीयांच्या नसानसात भिनलेली आहे. असे असले तरी याच भूमीवर मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, बौद्ध अशा अनेक धर्मांनाही तेवढाच मानसन्मान दिला जातो. प्रत्येक धर्मातील सण सारख्याच प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हिंदू धर्मातील दिवाळी,होळी,गणेशोत्सव यांसारख्या सण-उत्सवांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन बांधव सामील होताना दिसतात. तर मुसलमान बंधूंच्या ईद मध्ये हिंदू लोक ही आनंदाने भाग घेतात. ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणासाठी तर  सर्वच भारतीय एकमेकांना 'मेरी ख्रिसमस' असे म्हणत केक, मिठाई शुभेच्छा ख्रिसमस ट्री ची सजावट यांचा वर्षाव करतात. म्हणून कवी वसंत बापट प्रार्थना करतात....

 भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना

 मानवाच्या एकतेची, पूर्ण होवो कल्पना 

 मुक्त आम्ही फक्त मानू, बंधूतेच्या बंधना

 सत्य सुंदर मंगलाची,नित्य हो आराधना

 अशा या उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधुर भावना असलेल्या देशांमध्ये मात्र काही वेळा जातीय दंगली, धार्मिक तेढ, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, परकीय आक्रमणे अशा काही भयानक संकटांचा सामना करावा लागत आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमा भागात  चालू असलेला संघर्ष, पूर्वेला धुमसत असलेला नक्षलवाद, स्वतंत्र विदर्भासाठी चालू असलेले आंदोलन, दोन राज्यांमध्ये असलेला पाणी प्रश्न अशा देशांतर्गत चालू असलेल्या समस्यांबरोबरच शेजारील देशांची आक्रमणे, घुसखोरी,दहशतवाद यांसारख्या भयानक संकटांशी दोन हात करावे लागत आहेत.

   भाषाभेद,दारिद्र्य,बेकारी आर्थिक विषमता,भ्रष्टाचार, लाचखोरी, वशिलेबाजी यांच्या खाईत लोटलेल्या भारतीयांची आपल्या स्वतःची भारतीयत्वाची जाणीव हळूहळू बोथट होऊ लागली आहे. एकमेकांशी प्रेमळ संवाद करणारे डोळे दुसऱ्याकडे संशयाने बघू लागले आहेत. असे असताना माझा देश,माझे देश बांधव, मी भारतीय अशी एकजुटीची भावना कशी बळकट होणार?

पण सभोवतालच्या दुःखांना संकटांना घाबरतील तर ते भारतीय कसले ?

' भीती न आम्हा तुझी मुळी ही

 गडगडणाऱ्या नभा,

 अस्मानीच्या सुलतानीला

 जबाब देती जिभा'

 असे निर्भीडपणे सांगणाऱ्या भारतीयांच्या नसानसातून देशाभिमान, एकात्मता या भावना उसळून वाहत आहेत.

   इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येईल की, लाखो लोकांनी आजपर्यंत देशासाठी बलिदान दिले आहे. अजूनही लोक देशाच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी बलिदान देत आहेत. त्यासाठी आपण भारतीयांना  अभिमान असला पाहिजे. आपणही आपापल्या परीने देशासाठी काही ना काहीतरी  योगदान दिले पाहिजे.

   आपण सारे भारतीय एकत्र आलो तर काय चमत्कार घडेल! आपल्या भारतामध्ये अशा कितीतरी चांगल्या बाजू आहेत. आपला देश जगामध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे. हीच आपली मोठी शक्ती आहे.

 आपण जर या मनुष्यबळाचा कुशलतेने वापर करून घेतला तर जगामध्ये आपला देश सर्वात शक्तिशाली होईल.

      दुष्ट शत्रूंविरुद्ध लढण्याची हिंमत आम्हाला श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून दिलेली आहेच. त्याचबरोबर अलीकडच्या काळातील स्वातंत्र्यसैनिक, थोर समाजसुधारक उदाहरणार्थ- लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यापासून ते आधुनिक काळातील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर,अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजासाठी वाहून घेतलेल्या थोर व्यक्तीमत्त्वामुळे सर्वांनाच देश प्रेमाची प्रेरणा मिळते. मग लढा स्वातंत्र्याचा असो वा परकीय आक्रमणांचा. ते आंदोलन भ्रष्टाचार निर्मूलनाचे असो वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे.आपण सारे भारतीय एकजूट होऊनच लढू.कारण

 'भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई!

 पावन भूमी भारतातली ही आमची आई!!

 धन्यवाद!



January 9, 2023

माझा भारत महान Majha Bharat Mahan Marathi bhashan




 माझा भारत महान

 मराठी भाषण


माझा हिंदुस्थान,माझा,माझा हिंदुस्थान 

हिमाचलाचे हीरक मंडित शिरभूषण भरदार 

वक्षावर गंगा यमुनांचे सळसळती मौक्तिक हार 

कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार 

महोदधीचे चरणा जवळी गर्जतसे आव्हान  

       माझ्या भारतभूचे हे वर्णन ऐकताना रोमरोम फुलून येतो आणि निसर्गाच्या या मुक्त लावण्याबरोबरच गिरीशिखरांचे आणि महासागरांचे आव्हान नजरेसमोर ठाकते. भारताच्या नावाबरोबरच मला आठवते ती माझ्या देशाची अनेकविध परंपरा,संस्कृती आणि पवित्र्य यांचा मनोहर संगम इथं विनयाच्या कोंदणात शौर्य खुलतं तसा लाजऱ्या स्मितातून शालिनीता खुलते. शृंगाराबरोबर वीरता आणि विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे रमणीय रूप आहे.

      माझ्या देशाची संस्कृती संपूर्ण विश्वात वंदनीय, पूजनीय आहे.म्हणूनच स्वामी विवेकानंदांची माय 'ब्रदर्स अँड सिस्टर्स ' ही हाक साऱ्या धर्म मार्तंडाचे काळीज काबीज करून गेली.

       माझ्या देशावर निसर्गाने आपले लावण्य मुक्तहस्ते उधळले आहे. जणुसृष्टीचा लावण्य महोत्सवच. उत्तुंग हिमगिरी, नजर फिरेल अशा खोल दऱ्या,खळखळ करणाऱ्यांना नद्या,डोलणारी हिरवी शेती, तऱ्हेतऱ्हेची मनोहर फुले आणि पावला पावलावर बदलणारी अनेक मनोहर दृश्ये. निसर्गाचे हे मुक्त लावण्य जगाच्या पाठीवर कुठेही नाही. इंद्रधनुचे सात रंग, मोरपिसांची मोहक रंगसंगती यांचा सुरेख लावण्यविलास फक्त माझ्या देशातच पाहायला मिळतो.

'श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटेचोहिकडे,

क्षणात येते सरसर शिरवे,

क्षणात फिरुनी ऊन पडे.'

 हे फक्त माझ्या देशातच शक्य आहे.निसर्गाच्या या मुक्त लावण्यात आणखी एक रंग मिसळला आहे लाल. तो रंग आहे रक्ताचा.स्वधर्म, स्वदेश यांच्यासाठी ज्यांनी या धरणीवर आपले रक्त सांडले,तो रक्ताचा लाल रंग माझ्या देशातील त्यागाची महती सांगतो. सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,कृष्णदेवराय,राणा प्रताप या महापराक्रमी राजांनी माझ्या देशाचा इतिहास आपल्या रक्तांनी रंगवला आहे आणि माझ्या देशाची संस्कृती 'त्यागाची आहे भोगाची नाही' हे सिद्ध केले आहे.

      संस्कृती, संस्कृती असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एक अर्थ आहे.हा अर्थ 'प्रकृती,विकृती आणि संस्कृती' या तीन शब्दाधारे व्यक्त करता येतो. भूक लागली असता खान ही प्रकृती. भूक लागली नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला याची अधिक गरज आहे हे पाहून त्याला खायला घालणं ही संस्कृती आणि हीच आमची संस्कृती आहे. म्हणून तर 'अतिथी देवो भव' हा महामंत्र आम्ही जपला आहे.

    यजमानाचा धर्म आणि अतिथीचे स्वागत हे आमच्या संस्कृतीचे दोन स्तंभ आहेत. आमच्या संस्कृतीची शालिनीता, पावित्र्यता जपण्यासाठी आमच्या स्त्रियांनी सुद्धा आपले सर्वस्व पणाला लावले आहे म्हणून तर.......

 'अहिल्या, द्रौपदी,सीता,तारा मंदोदरी तथा

पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम् 

 असे आम्ही म्हणतो.आपल्या शालिनीतेने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आमच्या स्त्रियांनी आपल्या शौर्यानेही जगाचे डोळे दीपवले आहेत. राणी लक्ष्मीबाई,राणी चन्नम्मा,जिजाऊ माँसाहेब,अहिल्या होळकर, ताराराणी या स्त्रियांनी आपल्या डोईवरचा पदार्थ तसुभरही न हलवता हातात तलवारी घेतल्या आणि शालिनीता,पावित्र्य याचबरोबर रणचंडीकाही जगाला पाहायला मिळाल्या. हे फक्त माझ्या देशातच घडू शकते.

    माझ्या देशाची ही संस्कृती, ही परंपरा साऱ्या जगात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे हे मी अभिमानाने सांगतो.रामाचा त्याग, लक्ष्मण- भरताचे बंधुप्रेम,हनुमानाची स्वामिनीष्ठा, सीतेची पतीनिष्ठा, अर्जुनाचे शौर्य, भीमाची ताकद आणि कृष्णाचे कर्मयोग हे फक्त माझ्या देशातच निर्माण झाले. राम- कृष्णाची परंपरा,शिवाजी महाराज, राणा प्रताप यांचा चा इतिहास ही माझ्या देशाची श्रद्धास्थाने आहेत. शंकराचार्य, रामशास्त्री,भवभूती,कालिदास, व्यास,वाल्मिकी राजाभोज,शाहू महाराज,भगतसिंग,महात्मा गांधी, नेहरू, सावरकर, टिळक यांच्यापासून ते ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, कुसुमाग्रज यांच्यापर्यंतची अगणित अनमोल रत्ने केवळ माझ्या देशाच्या मातीतच जन्मली. हा माझ्या देशाचा तर गौरव आहेच पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तींचा गौरव जास्त आहे ज्यांना भारतभूसारखी मातृभूमी लाभली.

       अंतराळात आज आमची विमाने भिरभिरत आहेत. आमच्या पाणबुड्या सागरतळाचा शोध घेत आहेत.आमचे डॉक्टर नवनवीन औषधे शोधण्यात मग्न आहेत.आमचे शास्त्रज्ञ मानवाचे जीवन अधिकाधिक सुखी करण्यात प्रयत्नशील आहेत. आमचे खेळाडू देशाचा ध्वज आंतरराष्ट्रीय सामन्यातून अभिमानाने उंचावत आहेत. आमची मुस्लिम शीख  भावंडे आमच्या हातात हात घालून चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या सत्ताधारी पक्षाने व विरोधी पक्षांनी आमच्या देशातील लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत ठेवली आहे.

    म्हणूनच नेहरूंसारखा पुरुषोत्तम या देशाच्या मातीतच आपली रक्षा विसर्जित व्हावी अशी इच्छा बोलून दाखवतो तर भगतसिंग सारखा तेजस्वी युवक हसत हसत फासावर जाताना 'पुनर्जन्म जर असेल तर तो मला भारत भूमीतच मिळावा' अशी आस मनी बाळगतो. स्वातंत्र्यवीर सावरकर '  ने मजसी ने परत मातृभूमीला ' अशी त्या सागराला विनवणी करतात तर इकबाल सारखा एखादा कवी 'हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा 'अशी जाहीर कबुली देऊन माझ्या देशाला मानवंदना देतो. माझ्या देशाचा तिरंगा आपल्या तीन रंगाने विविधतेतून एकतेबरोबरच आमची त्यागाची,शांततेची आणि समृद्धीची प्रतिमा आसमानापर्यंत उन्नत मानेने सांगतो आहे.

    माझ्या देशाच्या या साऱ्या सत्यशील,सुंदरतेला दृष्ट लागू नये म्हणून हत्याकांडाचे भ्रष्टाचाराचे, गालबोट लागले आहे.हे गालबोट जोपर्यंत चेहऱ्यावरील तिळाच्या रूपात असते तोपर्यंत ते सौंदर्यतीत ठरते पण हे गालबोट जर साऱ्या सौंदर्यावर पसरले तर या सुंदरतेची कुरूपता व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवायचं तुम्ही,आम्ही साऱ्यांनी ज्यांना तिरंगा पाहताना भरून येत त्यांनी.

  म्हणूनच मित्रांनो चला, तुम्हाला खळाळणाऱ्या सागराची आण... तुम्हाला या भूमीच्या कणाकणाची शपथ..... या माझ्या देशाची ही गौरवशाली परंपरा,त्या परंपरेचे आपण पाईक आहोत.म्हणूनच आपण एक मुखाने म्हटले पाहिजे...

 गे माय भू तुझे मी,

 फेडीन पांग सारे.

आणीन आरतीला,

हे सूर्य,चंद्र तारे.

 धन्यवाद!




 





January 7, 2023

भाषाविषयक सामान्य ज्ञान Samanydnyan




 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत, भाषाविषयक सामान्य ज्ञान.

-----------------------------------

 कवी व लेखकांची पूर्ण नावे.

-----------------------------------

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे - पु ल देशपांडे

पांडुरंग सदाशिव साने-  साने गुरुजी

कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

यशवंत दिनकर पेंढारकर - कवी यशवंत

त्र्यंबक बापूजी ठोंबरे -  बालकवी

विष्णू वामन शिरवाडकर-  कुसुमाग्रज

राम गणेश गडकरी -  गोविंदाग्रज

मुरलीधर नारायण गुप्ते -  बी

-----------------------------------

थोर व्यक्तींची नावे व संबोधने

-----------------------------------

लोकमान्य -  बाळ गंगाधर टिळक

राष्ट्रपिता - मोहनदास करमचंद गांधी

सरदार, लोहपुरुष -  वल्लभभाई पटेल

नेताजी - सुभाषचंद्र बोस

महात्मा - जोतिबा फुले, मोहनदास करमचंद गांधी

पितामह - दादाभाई नौरोजी

स्वातंत्र्यवीर - विनायक दामोदर सावरकर

महर्षी - वी.रा.शिंदे, धोंडो केशव कर्वे

गुरुदेव - रवींद्रनाथ टागोर

पंडित,चाचा - जवाहरलाल नेहरू

------------------------------------

 थोर नेते व प्रसिद्ध व्यक्ती यांची पूर्ण नावे

------------------------------------

म. गांधी -  मोहनदास करमचंद गांधी

पं.नेहरू -  जवाहरलाल मोतीलाल नेहरू

लो. टिळक - बाळ गंगाधर टिळक

म. फुले - जोतिबा फुले

बाबा आमटे - मुरलीधर देविदास आमटे

लता मंगेशकर - लता दीनानाथ मंगेशकर

आगरकर - गोपाळ गणेश आगरकर

आंबेडकर - भीमराव रामजी आंबेडकर

स्वा.सावरकर - विनायक दामोदर सावरकर

------------------------------------

 संतांची पूर्ण नावे

------------------------------------

संत ज्ञानेश्वर - विठ्ठल पंत कुलकर्णी

संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा आंबिले

संत नामदेव - नामदेव दामाशेटी शिंपी

संत एकनाथ - एकनाथ  सूर्यनारायण पंत

संत रामदास स्वामी - नारायण सूर्याजी ठोसर

-----------------------------------

 थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा

-----------------------------------

'आराम हराम है ।'  - पंडित नेहरू

चले जाव -  महात्मा गांधी

"जय जवान, जय किसान " -  लालबहादूर शास्त्री

"मेरी झाशी नही दूंगी ।" -  राणी लक्ष्मीबाई

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा । "-  सुभाषचंद्र बोस

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!" - लोकमान्य टिळक

"जय जवान,जय किसान,जय विज्ञान " - अटल बिहारी वाजपेयी

-----------------------------------

 राष्ट्रीय महत्त्वाची माहिती

-----------------------------------

राष्ट्रीय फूल - कमळ

राष्ट्रीय प्राणी - वाघ

राष्ट्रीय पक्षी - मोर

राष्ट्रीय ध्वज - तिरंगा

राष्ट्रगीत - जन-गण-मन

राष्ट्रीय गीत - वंदे मातरम

-----------------------------------

 काही कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे

-----------------------------------

माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन 

गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी 

शंकर काशिनाथ गर्गे - नाट्यछटाकार, दिवाकर 

चिंतामण त्र्यंबक  खानोलकर - आरती प्रभू 

नारायण मुरलीधर गुप्ते - बी 

दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त 

मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत 

नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास 

यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत 

विनायक जनार्दन करंदीकर-  विनायक 

काशिनाथ हरी मोडक -  माधवानुज 

दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी 

आत्माराम रावजी देशपांडे - अनिल 

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार 

शंकर केशव कानेटकर गिरीश 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी 

वि. वा. शिरवाडकर - कुसुमाग्रज 

राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज ,,बाळकराम 

कृष्णाजी केशव दामले -  केशवसुत

-----------------------------------

 काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी लेखक 

-----------------------------------

ज्वाला आणि फुले - बाबा आमटे 

स्वेदगंगा - विंदा करंदीकर 

बिजली - वसंत बापट 

गीत रामायण-  ग. दि. माडगूळकर 

यथार्थदीपिका - वामन पंडित 

केकावली - मोरोपंत 

दासबोध व मनाचे श्लोक - समर्थ रामदास 

भावार्थरामायण - संत एकनाथ 

नल -दमयंती ,स्वयंवराख्यान - रघुनाथ पंडित 

अभंग गाथा - संत तुकाराम 

भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) - संत  ज्ञानेश्वर

-----------------------------------

 काही नाटके व त्यांचे नाटककार

-----------------------------------

 नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर 

टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर 

साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी -  अत्रे 

प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव ,एकच प्याला, भावबंधन - राम गणेश गडकरी 

कीचकवध, भाऊबंदकी ,मानापमान, विद्याहरण - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर 

सौभद्र - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर 

शारदा -  गोविंद बल्लाळ देवल

-----------------------------------

 काही पुस्तके व त्यांचे लेखक

-----------------------------------

 एक झाड, दोन पक्षी -  विश्राम बेडेकर 

मृत्युंजय , छावा -  शिवाजी सावंत 

तराळ-  अंतराळ - शंकरराव खरात 

बलुतं -  दया पवार 

कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण 

कऱ्हेचे पाणी - अत्रे 

स्मृती चित्रे - लक्ष्मीबाई टिळक 

एरंडाचे गुऱ्हाड - चि. वी. जोशी 

ययाती - वि. स. खांडेकर 

पडघवली - गो.नी. दांडेकर 

गीता रहस्य - लोकमान्य टिळक 

वहिनीच्या बांगड्या - जोशी 

चक्र - जयवंत दळवी 

स्वामी,श्रीमान योगी - रणजीत देसाई

गीताई - विनोबा भावे 

काळे पाणी,माझी जन्मठेप ,वि. दा. सावरकर 

रथचक्र ,गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे 

गुजगोष्टी - ना.सी. फडके 

श्यामची आई साने गुरुजी 

शाकुंतल, मेघदूत, रघुवंश, कालिदास, मृच्छकटिक,

शूद्रक ,मुद्राराक्षस -  विशाखा दत्त 

गीता - व्यास मुनी 

महाभारत - व्यास मुनी 

रामायण - वाल्मिकी

-----------------------------------

 महाराष्ट्रातील समाज सुधारक ,

 विचारवंत व प्रसिद्ध व्यक्ती

-----------------------------------

जगन्नाथ शंकरशेठ - आधुनिक मुंबईचे शिल्पकार 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर - मराठी वृत्तपत्र सृष्टीचे  जनक 

दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी

गोपाळ हरी देशमुख -लोकहितवादी 

भाऊ दाजी लाड -धन्वंतरी या नावाने गौरव 

महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक 

गणेश वासुदेव जोशी स्वदेशीचे आद्य प्रवर्तक 

सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 

महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री जातीचे उद्धारक ,पहिले महाराष्ट्रीय भारतरत्न 

महाराज सयाजीराव गायकवाड - हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - आधुनिक काळातील महान कलीपुरुष

राजर्षी शाहू महाराज - सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष

संत गाडगे महाराज - महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ 

सेनापती बापट - संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या आंदोलनातील अग्रणी 

कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक

आचार्य विनोबा भावे - भारतीय भूदान चळवळीचे जनक

डॉक्टर पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाजाचे संस्थापक 

क्रांतिसिंह नाना पाटील - ब्रिटिशांच्या विरोधातील प्रतिसरकारचे संस्थापक 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - 'ग्रामगीता ग्रंथाचे' निर्माते

बाबा आमटे - कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन चे निर्माते 

अण्णा हजारे - भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अध्यक्ष

वासुदेव बळवंत फडके - आद्य क्रांतिकारक 

विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमालाकार, मराठी भाषेचे शिवाजी 

शिवराम महादेव परांजपे - काळकर्ते 

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे -  इतिहासाचार्य 

दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक

श्रीधर व्यंकटेश केतकर - ज्ञानकोशकार 

नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व 

दत्तो वामन पोतदार - महामहोपाध्याय 

चिंतामणराव देशमुख - स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री

डॉ सलीम अली - जागतिक कीर्तीचे पर्यावरण व पक्षी तज्ञ

साने गुरुजी - मृत्यूचे चिंबन चुंबन घेणारा महाकवी, अमृताचा पुत्र 

डॉक्टर होमी भाभा - भारताच्या अणुविज्ञानाचे जनक 




चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी - 12 4th Standard Talent Search Exam Guess Paper



 





 नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 

या पेजवरती आपणांस इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा विविध घटकावर आधारित Online Tests  सोडवायला मिळणार आहेत. आपण सरावासाठी त्या नक्की सोडवा व आपल्या मित्रांना Share करा. 

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 12

 4th Standard Talent Search Exam
 Guess Paper






यापूर्वीच्या सर्व टेस्ट्स येथे सोडवा .


January 4, 2023

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 11 4th Standard Talent Search Exam Guess Paper

 




चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 11
 4th Standard Talent Search Exam Guess Paper

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, 



चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच - 11
 4th Standard Talent Search Exam Guess Paper
येथे सोडवा .





January 3, 2023

माझा भारत महान मराठी भाषण निबंध Majha Bharat Mahan




 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत मराठी भाषण

माझा भारत महान

धन्य धन्य हे भारत माते,

मला तुझा अभिमान,

दिशा दिशातून आज गर्जते,

तुझ्या यशाचे गान....

    या देशाला प्राचीन सांस्कृतिक, समृद्ध परंपरांचा इतिहास लाभला आहे. या देशाची भूमी हरित समृद्धतेने नटलेली आहे. या देशातल्या संस्कृतीचा प्रवास ज्ञानापासून तत्त्वज्ञानाकडे, परंपरांपासून पुरोगामीत्वाकडे झाला आहे. अशा या माझ्या महान भारत देशाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये अभिमानाची ज्योत फुरफुरत असते.

      उत्तरेकडील हिमालय पर्वत जणू भारत भूमीच्या शिरावर मुकुटासारखा शोभून दिसतो आहे. गंगा, यमुना,सिंधू सारख्या नद्या त्यांच्या पैलतीरावरील भूमीला समृद्धी आणि संपन्नतेचे वरदान देत आहेत.धनधान्य आणि फळाफुलांनी बहरलेले शेतमळे हे आमच्या कृषीप्रधान देशाचे वैभव आहे.

"जहाँ डाल डाल पर सोनेकी   चिडीयां करती है बसेरा,वह भारत देश है मेरा । "

        खंडप्राय अशा माझ्या भारत देशामध्ये प्रांतिक, सांस्कृतिक धार्मिक, भाषिक इत्यादी अनेक बाबतीत विविधता आढळते. परंतु ज्याप्रमाणे सूर सात असले तरी संगीत मात्र एक असते, त्याचप्रमाणे इथल्या प्रचंड विविधतेत नांदणारी एकता, हे माझ्या देशाचे भूषण आहे. भारत ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची, दृष्ट संहारक श्रीकृष्णाची भूमी आहे. याच भूमीवर अनेक संतांनी अध्यात्माच्या माध्यमातून समानतेची, संस्कृतीची गुढी उभी केली. शाहू फुले आंबेडकरांसारख्या महामानवांनी मानवतावादाची शिकवण इथल्या समाजाला दिली. गांधी,टिळक भगतसिंग,सावरकर यांसारख्या महान रत्नांना याच भूमीने जन्म दिला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या तेजाने या देशाचा इतिहास दैदिप्यमान झाला.

      पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या देशाच्या प्रगतीला सुरुवात झाली. स्वातंत्र्यांने निश्चितच आम्हाला आधुनिकतेचे वरदान दिले. भाक्रा- नांगल सारखी अनेक धरणे बांधून शेती व वीज क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली. गेल्या 75 वर्षात हेक्टरी उत्पादन  वाढले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती गगनाला भिडली आहे. पृथ्वी,नाग,आकाश,त्रिशूल,अग्नी यांसारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करून माझ्या देशाने संरक्षण सिद्धता साध्य केली आहे. लसीकरणाच्या माध्यमातून रोगांचे निर्मूलन केले आहे. 1986 च्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकरण होऊन शिक्षण गरिबांच्या झोपडी पर्यंत पोहोचले.

     अशाप्रकारे भौतिक आणि अभौतिक अशा सर्वच बाबतीत माझ्या देशाच्या प्रगतीचा आलेख सदोदित उंचावतच आहे. भविष्यामध्ये हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर उभे राहून माझा देश साऱ्या जगाला भौतिक,नैतिक व सांस्कृतिक प्रगतीचा आदर्श सांगणार आहे. कारण इथल्या भौतिक प्रगतीच्या वेगाला नैतिकतेचे अधिष्ठान आहे. आधुनिकतेच्या पर्वाला संस्कार आणि संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. फक्त हे वैभव आपण प्रत्येक भारतीय नागरिकांनी जपायला हवे. भूतकाळातील ऐतिहासिक वारसा पाठीशी घेऊन वर्तमानातील समस्यांना तोंड देत, भविष्यातील उज्वल यश प्राप्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एकाने शंभर पावलं चालण्यापेक्षा 100 जण मिळून हातात हात घालून एक पाऊल चालू या! येणारा दिवस आपलाच असेल आणि भविष्यामध्ये विश्वाच्या क्षितिजावर आपला तिरंगा ध्वज सर्वोच्च ठिकाणी फडकताना दिसेल. शेवटी साने गुरुजींच्या शब्दात अपेक्षा व्यक्त करतो...

 ' बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.'

 

December 29, 2022

सामान्यज्ञान : विज्ञानावरील काही महत्त्वाची माहिती

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विज्ञान विषयातील काही महत्त्वाची माहिती.

 मिथेन वायू ला मार्शगॅस असेही म्हणतात.

 पोलाद ही लोखंडाचे संमिश्र आहे.

माणूस 0  ते 80 डेसिबल क्षमतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो.

 सरासरी प्रौढ माणसाच्या हृदयाची 72 ठोके पडतात.

 बेरीबेरी हा रोग थायमिनच्या अभावामुळे होतो.

स्कर्व्ही हा रोग 'क' जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.

' ड ' जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो.

 'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो.

कॅरोटीन घटकामुळे दुधाचा रंग पांढरा होतो.

शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी म्हणजे यकृत.

कॉलरा रोगामुळे शरीराचे निर्जलीकरण होते.

इन्सुलिन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते.

इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह हा आजार होतो.

कुष्ठरोग बरा करण्यासाठी औषध- डॅप्सोन.

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आठ मिनिटे लागतात.

 क्ष - किरणांच्या सततच्या सानिध्याने कर्करोग होतो.

गॅमा किरणांचा मारा केल्यास फळे अनेक दिवस टिकतात.

प्लास्टिकच्या पिशव्या इथेनिल पासून तयार होतात.

निष्क्रिय वायूंना O गणांमध्ये स्थान दिले जाते.

सोने या मूलद्रव्याची संज्ञा- Au.

शरीरामध्ये 65 टक्के पाणी असते.

 'ब' व 'क' जीवनसत्व पाण्यात विरघळतात.

खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव सोडियम बायकार्बोनेट आहे.

निकटदृष्टीता हा दृष्टीदोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात.

हवेचे तापमान वाढले असता ध्वनीचा वेग वाढतो.

पेट्रोलियम हे हायड्रोकार्बनचे मिश्रण आहे.

सदाफुली ही सपुष्प वनस्पती आहे.

हिरा ग्राफाईट हे कार्बन मूलद्रव्याचे रूप आहे.

निरोगी माणसाचा रक्तदाब 80 ते 120 असतो.

माणसाने वापरलेला पहिला धातू तांबे.

पोलिओची लस तोंडावाटे दिली जाते.

राष्ट्रीय विज्ञान दिन- 28 फेब्रुवारी.

विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक- अँपियर.

संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग सिलिकॉन पासून बनविला जातो.

हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो.

भारताने पहिला अणुस्फोट  1974 साली पोखरणला केला.

गोबरगॅस हा प्रामुख्याने मिथेन वायूचा बनलेला असतो. 

मुडदूस हा रोग 'ड ' जीवनसत्व अभावामुळे होतो.

सायकलचा शोध मॅकमिलन यांनी लावला.

सिस्मोग्राफ या साधनाने भूकंप लहरी मोजतात.

कुष्ठरोगावरील प्रभावी औषध- सल्फोन.

नील आर्मस्ट्रॉंग या अमेरिकन मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.

खडू म्हणजे रासायनिक दृष्ट्या कॅल्शियम कार्बोनेट.

भूकंपाचे मोजमाप करण्याचे एकक - रिश्टर.

 AB रक्तगटास कोणाचेही रक्त चालते. (सर्व योग्य ग्राही म्हणतात.)

हवेतील प्रमुख घटक नायट्रोजन.

रेल्वे इंजिनचा शोध -स्टीफन्स.

ग्रामोफोन चा शोध -एडिसन.

अंतराळात पहिला कृत्रिम उपग्रह सोडणारा देश रशिया.

फॉस्फरस पेंटॉक्साईड चा रंग पांढरा.

भारतातील पहिली महिला अंतरिक्ष यात्री - कल्पना चावला.

दुधाचे दही होणे ही क्रिया जैव रासायनिक.

हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथस्कोप वापरतात.

वस्तू डोळ्यांपासून दूर नेल्यास त्याची आभासी प्रतिमा लहान होते.

नायट्रोजन वायूचा शोध - डॅनियल रुदरफोर्ड.

विजेच्या दिव्याचा शोध - एडिसन.

प्रौढ व्यक्तीच्या शरीरात 206 हाडे असतात.

वाफेचे इंजिन चा शोध- जेम्स वॅट.

घड्याळाच्या स्प्रिंग मध्ये स्थितिज ऊर्जा असते.

होकायंत्रात दिशा दर्शवण्यासाठी चुंबक सूचीचा वापर करतात.

भूल देण्यासाठी ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साईड हे मिश्रण वापरतात.

निळा लिटमस आम्लामध्ये तांबडा होतो.

लिंबाच्या रसात सायट्रिक आम्ल असते.

आवळ्यामध्ये 'क ' जीवनसत्व असते.

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा 1975 साली अंतराळात गेला.

 


   

शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे



नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

 आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी  उपयुक्त घटक मराठी व्याकरण शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे.


व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्धलेखन म्हणतात. अर्थपूर्ण शुद्धलेखनासाठी अनुस्वार ऱ्हस्व,दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

   शुद्धलेखनाचे काही नियम

 1) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा. उदा कांदा, भिंत, सुगंध,दिंडी, संबंध इ.

 2) एक अक्षरी शब्दातील 'इ' व 'उ'  हा स्वर दीर्घ लिहावा. उदा. मी, जी, ती, धू, जू, इ .

 3) सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा 'इ ' किंवा  'उ 'हा स्वर दीर्घ लिहावा. उदा. कवी, रवी, विद्यार्थी, गुरु,अणू,पशू इ. (अपवाद 'आणि', परंतु, तथापि.) मात्र हे शब्द जोडशब्दात प्रारंभी आले तर त्यातील शेवटचा 'इ ' किंवा 'उ ' स्वर ऱ्हस्व लिहावा.उदा. कविचरित्र, विद्यार्थिभांडार,गुरुकृपा, पशुधन इ.

 4) अकारान्त शब्दातील उपांत्य (शेवटून दुसरे अक्षर)   'इकार' व 'उकार' दीर्घ लिहावा.उदा.  वीट, मीठ,खीर, दूध, तूप, नवनीत, जमीन,कबूल इत्यादी.

 5)  शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील 'इकार' व 'उकार' बहुदा ऱ्हस्व लिहावा. उदा. गरिबी, पाहुणा, किती, दिवा, महिना, नमुना, हुतुतू, बहिणी, वकिली इत्यादी.

 आता आपण इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित काही शुद्ध शब्द पाहूयात.

आकृती

गरीब

किंतु

यथाशक्ती

गणपतीपूजन

संसार

चिन्मय

मैत्रिणी

नीती

जीभ 

श्री

व्यूह

उभयान्वयी

विहीर

कुस्ती

दुग्ध

सूक्ष्म

चातुर्य

भूर्रकन

गतिरोधक

की 

तथापि 

निर्मळ

मतिमंद

उत्साह

नमुना

विळी 

विभूती

पीठ

मूल

नारिंगी

कुटुंब

बाहुली

कनिष्ठ

पुण्य

ग्रीष्म

दुर्बीण

मूल्य

दुर्गंध

अद्यापि 

हुकूम

भितिदायक

ऋषिपत्नी

संरक्षण

पहिला

गीता

रविकिरण

तूप

गृहपाठ

भिंग

चुंबक

किल्ला

गुप्त

पूज्य

बहिर्गोल

दुर्मिळ

गिर्‍हाईक

अंतरिक्ष

अनिल

अधीर

अधीन

इतिहास

कुकर्म

निरभ्र

विहीर

कृत्रिम

निर्जन

ज्योतिषी

प्रार्थना

संयुक्तिक

जिज्ञासू

साधर्म्य

औपचारिक

आशीर्वाद

अभ्युदय

कीर्ती

कवडीचुंबक

कनिष्ठ

उत्कृष्ट

विक्षिप्त

चिरंजीव

नियुक्त

शारीरिक

जर्जर

निष्कारण

शीर्षासन

साधर्म्य

तात्कालीक

प्रीती

तीर्थस्वरूप

ब्राह्मण

सिंह

त्रिभुवन 

चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सरावसंच - 10 4TH STANDARD TALENT SEARCH EXAM GUESS PAPER



नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, आज आपण चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव चाचणी क्र.10 सोडवणार आहोत. यापूर्वीच्या सरावचाचण्या  सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा. आपल्याला या सरावचाचण्या निश्चितच उपयुक्त ठरतील.

 



चौथीप्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट क्र.10 
4TH STANDARD TALENT SEARCH GUESS PAPER 

     

December 25, 2022

12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती भाषण Swami Vivekanand Marathi Speech

 



12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती

                    12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती. 'तेजस्विता'  आणि 'तपस्विता' हे दोन शब्द आपल्यासमोर जेव्हा उभे राहतात , तेव्हा तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून 'स्वामी विवेकानंद' यांचे नाव आपल्यासमोर उभे राहते. अशा या महान विभूतीचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कोलकत्ता येथील सिमेलिया या ठिकाणी झाला. विश्वनाथ दत्त व भुवनेश्वरी देवी यांचे पुत्र म्हणजे विवेकानंद.

         स्वामीजींच्या शालेय जीवनापासून पाहिले तर असंख्य दाखले आणि उदाहरणे स्वामीजींच्या  बाबतीत पहावयास मिळतात.देव आणि धर्म,कर्मकांड यामध्ये  विभागलेल्या समाजाच्या परिस्थितीकडे स्वामीजींनी स्वतःचे  लक्ष वेधले . स्वामीजी त्यांच्या याच कृतीतून उदयास आले व संपूर्ण देश भ्रमंती करण्याचा निर्णय स्वामी विवेकानंदांनी घेतला.

       स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत , कोणत्याही राष्ट्राचे भवितव्य हे त्या राष्ट्रातील युवा पिढीवरती अवलंबून असते. राष्ट्राची जडणघडण ही त्या देशातील युवाशक्तीच्या   प्रेरणेवरती अवलंबून असते. अशीच शक्ती मला राष्ट्रासाठी संघटित करायची आहे. हे स्वामीजींच्या मुखामध्ये सदैव उद्गार असत. अंगावरती भगवी वस्त्रे , डोक्यावरती फेटा घालून स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान लोकांच्या समोर मांडण्यासाठी जगभ्रमंती केली.

        शिकागोतील धर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबरला स्वामीजी ज्यावेळी शिकागो येथे धर्म परिषदेसाठी गेले होते. त्यावेळी स्वामीजींचा वेश पाहून सर्व लोक अचंबित  झाले होते.हा संन्याशी माणूस काय बोलणार, असा सर्व लोकांना प्रश्न पडला होता.स्वामीजी ज्यावेळी बोलायला उभे राहिले, सभागृहावरती चौफेर नजर फिरवल्यानंतर स्वामीजींनी आपल्या भाषणाची सुरुवात ' माझ्या बंधू आणि भगिनींनो'  या एकाच वाक्याने केली आणि सभागृहांमध्ये प्रचंड टाळ्या. एका भाषणाने सर्व लोकांना मंत्रमुग्ध केले आणि विवेकानंदांनी आपल्या हजारो शिष्यांची निर्मिती केली.पाश्चिमात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकत असलेल्या भारतीय संस्कृतीला ,भारतीय जनतेला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य स्वामीजींनी केले.

        सर्वधर्मसमभाव, संयम आणि शांततेचा मार्ग पत्करणारा महापुरुष महान,त्यागी देशभक्त ,महान तत्वज्ञ, बुद्धिजीवी व्यक्तिमत्व, प्रतिभा संपन्न असा वक्ता म्हणून स्वामीजींच्याकडे पाहिले जाते. जगभराची भ्रमंती करणाऱ्या  या महामानवाने वेगवेगळ्या  देशांमध्ये फ्रान्स, जर्मन ,अमेरिका व इंग्लंड या ठिकाणी गाजलेली त्यांची पाच भाषणे आजही प्रसिद्ध आहेत.

       'मातापित्यांबरोबरच मातृभूमीला ही महत्त्व देणारा एक महान योगी आणि एक ब्रह्मचारी' अशी ख्याती स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीत पहावयास मिळते. अशा या महान विभूतीचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी झाला. आज ही कन्याकुमारी या ठिकाणी गेल्यानंतर स्वामीजींच्या कर्तृत्वाची ओळख होते.

       स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा 'युवक दिन' म्हणूनही साजरा केला जातो. तारुण्याचा उपयोग हा जनसामान्यांसाठी करायचा असतो. देश प्रेमाने व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रसार करणाऱ्या विभूतींमध्ये स्वामीजींचा समावेश होतो. आजच्या युवा पिढीने याच गोष्टींचा आदर्श घेण्याचे कार्य जर केले तर स्वामीजींच्या स्वप्नातील हा देश साकार होईल असे वाटते.

      कर्मकांडांना विरोध करून मानवतावादी विचार मांडणारा, समतेचा संदेश देणारा ,राष्ट्रप्रेमाची पताका खांद्यावरती घेऊन धर्मप्रसार करणारा एक महान विभूती म्हणून स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिले जाते. याच तपस्वी, त्यागी वृत्तीचा, प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी करत असताना घेणे गरजेचे आहे.

 धन्यवाद !

नेताजी सुभाषचंद्र बोस Netaji Subhashchandra Bose

 



नेताजी सुभाषचंद्र बोस

 भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांचीच आपल्याला मोठ्या प्रमाणात आठवण होत असताना पहावयास मिळते. देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा'  पद्धतीला अगदी तशाच पद्धतीने उत्तर दिले पाहिजे, असे रोखठोकपणे प्रखर विचार मांडणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा  जन्म ओरिसा राज्यातील कटक या गावी 23 जानेवारी 1897 साली झाला. आपले महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर ते विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील परकीयांच्या सेवेत गुंतण्यापेक्षा स्वकीयांची  सेवा  कधीही चांगली,  ही भूमिका समोर ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजींच्या समवेत स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले.  1923 मध्ये महात्मा गांधीजी व नेताजी यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले.  यातूनच नेताजींनी 'स्वराज्य पक्षात' प्रवेश केला.

     नेताजी आपल्या कृतीशील विचारांमुळे बंगाल नगरपालिकेचे कार्याधिकारी बनले. 1924 साली  नेताजींचे क्रांतिकारी विचार पाहून , त्यांना मिळणारा तरुणांचा प्रतिसाद पाहून ब्रिटिशांनी नेताजींना तुरुंगात धाडले. नेताजी 1938व 1939 या दोन्ही वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. पुन्हा 1939 साली आपल्याच विचारश्रेणीत 'फॉरवर्ड ब्लॉक' पक्षाची स्थापना केली.

         भारतात राहून ब्रिटिशांचा पराभव करता येणार नाही तर जागतिक अंदाज घेऊन ब्रिटिशांचा पाडाव करता येईल,  अशी नेताजींची ठाम भूमिका होती. नेताजी  1941 साली रशिया मार्गे जर्मनीला पोहोचले. परदेशात गेल्यानंतर नेताजींनी 'आझाद हिंद सेना' ही संघटना रासबिहारी बोस व कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने 1942 साली स्थापन केली. तसेच 1943 साली आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद स्वीकारले. आपल्या सेनेत नुसते पुरुष असून चालणार नाहीत तर स्त्रियांचाही सहभाग असला पाहिजे यासाठी नेताजींनी आझाद हिंद सेनेत 'झाशीची राणी' रेजिमेंट ची सुरुवात केली आणि त्याचे नेतृत्व हे कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्याकडे दिले. पारतंत्र्याच्या कालखंडातही स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारा क्रांतिकारक महापुरुष म्हणून नेतांजींकडे पाहिले जाते. सैन्याचे, प्रजेचे नेतृत्व करण्याची क्षमता पाहून जनतेने त्यांना 'नेताजी' ही पदवी बहाल केली.

     "तुम मुझे खून दो ! मै तुम्हे आझादी दूंगा!" या  एका वाक्यात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कलकत्त्यापासून सिंध पर्यंत लाखो तरुणांना  संघटित करण्याचे कार्य नेताजींनी केले.देशाला स्वातंत्र्य हे शांततेतून नाही तर क्रांतीच्या बळावरच मिळणार आहे, हे नेताजींना माहीत होते. नेताजींनी 'जय हिंद!'  आणि 'चलो दिल्लीचा'  नारा दिला. 1943 ला अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यांचे नामकरण 'शहीद',  'स्वराज्य'  असे केले 1944 साली  आझाद हिंद सेनेने मॉवडॉक हे ठाणे जिंकून भारतीय भूमीतील पहिला विजय साजरा केला व थेट कोहिमा व इंफाळ पर्यंत धडक मारली. 1945 मध्ये 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा व 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या जपान मधील शहरांवरती अणुबॉम्ब  टाकल्याने युद्धाची गती थंडावली गेली. आझाद हिंद सेनेचे कार्य हे अल्प प्रमाणात भारतात थोड्या पद्धतीत थंडावले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी शिवनीतीचा वापर करत वेशांतर करून देशांतर करणारे एक क्रांतिकारी महापुरुष म्हणून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याकडे पाहिले जाते. जपान, जर्मनी यांसारख्या देशांची मदत मिळवण्यासाठी ते यशस्वी झाले होते. त्याचबरोबर आपल्या समवेत क्रांतिकारी विचारांचे तरुण निर्माण करत होते. अशा या महान नेत्यावरती ब्रिटिशांनी वेगवेगळ्या पद्धतीचे खटले दाखल केले ,तुरुंगात डांबले पण नेताजींनी तुरुंगात असतानाही आमरण उपोषण केले. ब्रिटिशांना त्यांना तुरुंगातून सोडून द्यावे लागले .ज्यावेळी नेताजी घरी होते त्यावेळी त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. अशा या महान महापुरुषाचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी टोकियोकडे जात असताना ताई पै येथे विमान अपघातात झाला.

    एक उत्तम प्रशासकीय अधिकारी ते स्वातंत्र्य सेनानी म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारी विचारांची चळवळ अंमलात आणून शस्त्राच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा एक महान सेनानी म्हणून, नेताजींचे नाव घेतले जाते. परकीय सत्तेचा योग्य पद्धतीने संबंध ठेवून, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची मदत घेऊन स्वातंत्र्याचे गीत गाणारे व परकीय सत्तेला नेस्तनाबूत करणारा महान योद्धा म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गौरव होतो.

    नेताजींच्या मृत्यूनंतर सुद्धा आझाद हिंद सेनेचे कार्य नेताजींच्या विचारांनी प्रभावी झालेल्या लाखो तरुणांनी प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या असंख्य समर्थकांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे खटले दाखल केले गेले. पण या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या समर्थकांच्या बचावा करता पंडित नेहरू, देसाई यांसारख्या नामवंत वकिलांनी वकिली केली. त्यांच्यावरती असणारे खटले रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. आज याच महापुरुषांच्या विचारांचा आपण आदर्श घेऊया.

 जय हिंद ! जय भारत !


नेताजींविषयी उत्कृष्ट भाषण येथे पहा . 




December 22, 2022

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण Republic Day Marathi Specch







आपला राष्ट्रीय सण - प्रजासत्ताक दिन 

दिवस हा सोन्याचा , 

तुमच्या माझ्या आनंदाचा ,

देशाच्या गौरवाचा ..... 

अभिमानाचा आणि उत्साहाचा ! 

दिवस हा आपुल्या न्यायाचा ...  , 

विजय असो

प्रजासत्ताक दिनाचा ! 

सन्माननीय व्यासपीठ , व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर , वंदनीय गुरुवर्य  आणि माझ्या बालमित्रांनो , 

आज २६ जानेवारी - म्हणजेच आपला ' प्रजासत्ताक दिन '. आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणांस काही चार शब्द सांगणार आहे , ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे.

              आपण सर्वजण सन १९५० पासून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' किंवा ' गणराज्य दिवस' म्हणून साजरा करतो .भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे.म्हणजेच लोकांनी, लोकांच्यासाठी , लोकांकरवी चालवलेले राज्य आहे.



देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण इंग्रजाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालो.स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय देणारी राजकीय व्यवस्था सुरु झाली . यालाच आपण 'लोकशाही शासनव्यवस्था' असेही म्हणतो. 

   या सर्वांचा पाया होता ' भारतीय राज्यघटना'.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार , नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे , हे देशासमोर मोठे आव्हान होते.शेवटी ही जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लिलया पेलली.त्यामुळे सर्व जगात श्रेष्ठ आणि आदर्श म्हणून ओळखली जाणारी 'भारतीय राज्यघटना' आकारास आली.त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांना ' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर , डॉ.राजेन्द्रप्रसाद , यासारख्या अनेक महनीय व्यक्तींचे घटनानिर्मितीत मोलाचे कार्य आहे. 

 २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करणेत आला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले.साऱ्या देशाने अन्यायाची,गुलामगिरीची कात टाकली आणि भारतभूमीत स्वातंत्र्य , समता , न्याय व बंधुता या लोकशाहीच्या सोनेरी पानांचा उदय झाला.म्हणूनच स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच हा दिवसही आपणा सर्वांसाठी आनंदाचा , आदराचा ,उत्साहाचा व त्यागाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

   याच दिवशी आपल्या पवित्र भारतभूमीवर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला.प्रत्येक मानवास सन्मानाने जगण्याचे, उंच भरारी घेण्याचे बळ या घटनेने दिले.म्हणूनच आपण हा दिवस आनंदाने व उत्साहाने साजरा करत आहोत व करत राहणार ! 

    या मंगलदिनी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो .त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या व सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व थोर व्यक्तींना याप्रसंगी वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो ! 

जय हिंद ! जय भारत !